About Us
Akhil Bharatiya Vanvasi Kalyan Ashram
हजारो वर्षांपूर्वी आपल्या संस्कृतीचा उदय झाला वनांमधून. या संस्कृतीची जोपासना केली तेथील रहिवाश्यांनी, म्हणजे जनजाती बांधवांनी. त्यांनाच आदिवासी, जनजाती असंही संबोधलं जातं, खरं तर या जनजातींशी आपलं रक्ताचं नातं आहे, पण स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या वाट्याला उपेक्षाच आली. ही परिस्थिती बदलली पाहिजे असं तीव्रतेनं वाटल्यानं महात्मा गांधीचे शिष्य पू. ठक्करबाप्पा यांनी जनजाती क्षेत्रात अनेक सेवाकार्ये सुरु केली. या सेवाकार्यापासून प्रेरणा घेऊन रमाकांत केशव ऊर्फ बाळासाहेब देशपांडे यांनी २६ डिसेंबर १९५२ या दिवशी वनवासी कल्याण आश्रम या सामाजिक संस्थेची स्थापना केली. ही स्थापना झाली (तेव्हाच्या) मध्यप्रदेशमध्ये असलेल्या जशपूर गावात. बाळासाहेब देशपांडे यांना या कार्यासाठी (तेव्हाचे) सरसंघचालक प.पू. गोळवलकर गुरुजी यांचे आशीर्वाद लाभले होते.
२६ डिसेंबर १९५२ला स्वर्गीय बाळासाहेब देशपांडे यांनी लावलेल्या या छोट्याशा रोपट्याचे रूपांतर आज एका प्रचंड वटवृक्षात झाले आहे. १९५२ मध्ये जशपूर, मध्य प्रदेश (जशपूर, आताचे छत्तीसगड राज्य) मध्ये वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना झाली असली तरी १९७८ ते १९८० च्या दरम्यान भारतातील ज्या ज्या राज्यात वनवासी क्षेत्र आहे, त्या त्या सर्व राज्यांमध्ये वनवासी कल्याण आश्रमाच्या कामाची सुरुवात झाली, म्हणजेच त्याला अखिल भारतीय स्वरूप मिळाले. आपल्या महाराष्ट्रात वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्याचा प्रारंभ १९७८ साली झाला.
बहात्तर वर्षांपूर्वी बाळासाहेबांनी एक स्वप्न पाहिले होते. या स्वप्नाला भरभक्कम आधार होता तो या देशाला पुन्हा वैभवशाली बनवण्यासाठी अखंड कार्यरत राहाण्याचा संकल्प उराशी बाळगलेल्या एका तेजस्वी राष्ट्र शक्तीचा आणि मुख्य म्हणजे त्यामागे होता एक दुर्दम्य विश्वास.. ‘नरसेवा हीच नारायण सेवा’ हा संस्कार वर्षांनुवर्षे मनावर कोरला गेलेल्या समाजातील जनशक्ती वरचा!
कुठले स्वप्न होते ते..? आपल्याच समाजाचे.. इथल्या प्राचीन व गौरवशाली परंपरेचे अभिन्न अंग असलेल्या वनवासी बांधवांची सर्वांगीण उन्नती साधून त्याला एवढे सामर्थ्यशाली बनवणे की राष्ट्र उभारणीच्या कार्यातही समाज आपले योगदान देऊ शकेल.
कल्याण आश्रमाच्या माध्यमातून जनजाती बांधवांना स्वावलंबी, स्वाभिमानी आणि संघटित करण्याचे कार्य आता संपूर्ण देशात विस्तारले आहे. हजारो समर्पित कार्यकर्त्यांच्या बळावर जनजाती क्षेत्राच्या प्रत्येक कोपऱ्यात हे कार्य पोहोचू शकेल, प्रत्येक समस्येला तोंड देऊ शकेल असे एक देशव्यापी संघटन उभारण्यात कल्याण आश्रम यशस्वी ठरला आहे. या कार्याचा परिणाम म्हणून जनजाती समाजातले हजारो कार्यकर्ते आपापल्या क्षेत्रात पाय रोवून उभे राहिले आहेत. कल्याण आश्रमातर्फे जनजाती क्षेत्रात हजारो सेवाप्रकल्प उभे करण्यात आले आहेत. या प्रकल्पांच्या द्वारे जनजाती समाजाची सेवा तर केली जात आहेच पण त्यांच्यात राष्ट्रीय भावनेचं जागरणही मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे.
वनवासी कल्याण आश्रमाची विभागणी देशपातळीवर ४० प्रांतांमध्ये करण्यात आली असून, महाराष्ट्रात ४ प्रांत आहेत. या प्रांतांपैकी पश्चिम महाराष्ट्र प्रांतामध्ये जनजाती कल्याण आश्रम, या नावाने संघटनेने व्यापक सेवाकार्य उभे केलेले आहे. शिक्षण, आरोग्य, आर्थिक विकास, बचत गट, श्रध्दा जागरण, पर्यावरण संरक्षण व संस्कार इ. विषय घेऊन हजारो सेवा प्रकल्प उभे राहिले. या साऱ्या प्रकल्पांच्या माध्यमातुन देशभरातील जनजाती क्षेत्रात जनजागृती होऊन प्रचंड शक्ती निर्माण होत आहे.
जनजाती बांधवांसाठी जनजाती कल्याण आश्रम महाराष्ट्रातही अनेक वर्षे कार्य करीत आहे. जनजाती मुलामुलींसाठी वसतिगृहे, शाळा चालविल्या जात आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाकडुन सक्रीय सहकार्याची अपेक्षा आहे. वैज्ञानिक युगात नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम शिकवायचा आहे. सर्व समाजाच्या पाठबळावरच गुही सारखे भव्य शिक्षण प्रकल्प, शाळा, प्रशिक्षण केंद्र इ. अनेक उपक्रम सुरु आहेत. सहयोग राशी घेऊन निधीसंकलनाचे व माणसे जोडण्याचे दुहेरी कार्य सातत्याने सुरु आहे. केवळ आर्थिकच नव्हे तर आपल्याकडे असलेले कौशल्य, वेळ देऊनही आपण या कार्यात सहभागी व्हावे, ही विनंती.
भूतकाळात सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणारा वनवासी समाज आज नव्या तेजाने तळपताना दिसू लागला आहे !
Our insipration – Late Shri Balasaheb Deshpande
आपले राष्ट्रीय अध्यक्ष
कल्याण आश्रमचे नूतन राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सत्येंद्र सिंह जी यांनी आपल्या आयुष्याची ६० वर्षे पूर्ण केली आहेत. ते गेली सुमारे ४० वर्षे सामाजिक जीवनात सक्रिय आहेत. लहानपणापासूनच संघाचे स्वयंसेवक असलेले सत्येंद्र सिंह जी यांचा जन्म १९ ऑगस्ट १९६४ रोजी झारखंड राज्यातील लातेहार जिल्ह्यातील मांजर या गावात झाला.
शालेय शिक्षण त्यांनी मांजर व लातेहार येथे पूर्ण केले. पुढील उच्च शिक्षणासाठी ते गुमला येथे आले. तेथे कल्याण आश्रमच्या वाल्मीकि छात्रावासात राहून त्यांनी बी.एस्.सी. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर १९८५ ते १९९० या काळात त्यांनी संघाचे प्रचारक म्हणून कार्य केले. १९९४ पासून त्यांनी कल्याण आश्रमचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम सुरू केले.
एकल विद्यालयचे संच प्रमुख, विभाग संघटन मंत्री, झारखंड प्रांत सह संघटन मंत्री, प्रांत संघटन मंत्री तसेच अखिल भारतीय उपाध्यक्ष अशी विविध जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. आज त्यांच्यावर कल्याण आश्रमच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी आहे.
एका लहानशा जनजातीय गावात जन्म घेऊन देशभर कार्यरत असलेल्या अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमसारख्या विशाल सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्षपद मिळवणारे सत्येंद्र सिंह जी बाह्यतः अतिशय साधे वाटतात. मात्र त्यांच्या या साध्या व्यक्तिमत्त्वात असंख्य गुणांनी परिपूर्ण अशी विलक्षण प्रतिभा दडलेली आहे.
संघ व कल्याण आश्रमच्या विचारांची स्पष्टता, कार्यपद्धतीवरील ठाम विश्वास, आपले विचार स्पष्ट व प्रभावीपणे मांडण्याची खास शैली, सखोल अध्ययन व अचूक आकलनशक्ती, शांत, साधा व निष्कपट स्वभाव अशा अनेक गुणांनी युक्त असे सत्येंद्र सिंह जी यांचे व्यक्तिमत्त्व आहे.
प्रांत कार्यकारिणी
| No. | Name | Designation (दायित्व) |
|---|---|---|
| 1 | श्री डॉ भरत जी केळकर | प्रांत अध्यक्ष |
| 2 | श्री डॉ मधुकर जी आचार्य | प्रांत उपाध्यक्ष |
| 3 | सौ कविता ताई राऊत | प्रांत उपाध्यक्ष |
| 4 | श्री प्रा. शरद जी शेळके | प्रांत सचिव |
| 5 | श्री संदीप जी साबळे | प्रांत सहसचिव |
| 6 | श्री महेंद्र जी जाखेटे | प्रांत सहसचिव |
| 7 | श्री प्रकाश जी खिचडे | प्रांत कोषाध्यक्ष |
| 8 | श्री धनंजय जी जमादार | प्रांत सह कोषाध्यक्ष |
| 9 | श्री ऋषभ जी मुथा | कार्यकारिणी सदस्य |
| 10 | सौ कल्पना ताई महाले | कार्यकारिणी सदस्य |
| 11 | श्री सुनील जी सावंत | कार्यकारिणी सदस्य |
| 12 | श्री परशुराम गावित | कार्यकारिणी सदस्य |
| 13 | श्री रवींद्र जी गुरसाळे | कार्यकारिणी सदस्य |
| 14 | श्री जयराम जी चौधरी | निमंत्रित सदस्य |
| 15 | श्री विशाल जी भुरुक | निमंत्रित सदस्य |
